महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जागावाटपावरून महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्यासाठी तिन्ही गटांमध्ये चढाओढ आहे. त्यातच भाजपने आता लाडक्या बहीणींना पाठवलेल्या पत्रातून मिंधे, अजित पवार यांचे नाव आणि फोटो हटवला आहे. तसेच या योजनेचे श्रेय हे भाजप आणि दवेंद्र फडणवीस यांचे आहे, असा भ्रम पसरवण्यात येत आहे. या पत्रामुळे भाजपला मिंधे आणि अजित पवार यांना लाथ मारण्याची घाई झाली आहे, असे दिसून येत आहे.
भाजपा एक नंबरचा कारस्थानी व कपटी आहे. भाजपवर कोणीही विश्वास ठेवू नये, ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. निवडणूकीपूर्वी ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणूकीनंतर ते मिंधे गटाचा काटा काढतील. ते मिंधे गटाची गर्दन उडवतील. ते अत्यंत निर्दयी आहेत. कोणत्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व मिंधेंकडे राहू नये यासाठी आतापासून भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत, असे वक्तव्य चार दिवसांपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले होते. आता त्यांनी हे वक्तव्य 100 टक्के खरे ठरत असल्याचे पुरावाच दिला आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने पात्र ठरविलेल्या बहिणींना भाजपने पत्रे पाठविली आहेत. सरकारी डेटा वापरून ही पत्रे पाठवण्यात आली आहेत. या पत्रात मिंधेंचा फोटो नाही. मिंधेंचे नावही नाही. ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’’ असे या योजनेचे नाव असतांना “मुख्यमंत्री “शब्द येणार नाही याची काळजी भाजपने या पत्रात घेतली आहे. योजनेचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी व भाजपला घेण्याचा प्रयत्न या पत्रात केला आहे. बहिणींचा लाडका भाऊ देवेंद्र फडणवीस आहे असा भ्रम तयार करण्यात येत आहे. पत्रावर व सोबतच्या पाकीटावर तीन ठिकाणी फक्त कमळाचे चिन्ह प्रकाशित करुन बहिणीबद्दल प्रेम कमी व मते मिळविण्याचा किळसवाणा प्रयत्न यातून दिसून येत आहे. तसेच या पत्रात भाजपने आपल्या चार नेत्यांचे फोटो प्रकाशित करून मिंधे व अजित पवारांना आतापासूनच लाथ घातली आहे. निवडणूकीनंतर भाजप मिंधे आणि अजित पवारांना लाथ घालतील असा अंदाज असताना निवडणुकीपूर्वीच लाथ घालण्याची घाई भाजपला झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.