…तर मग अजित पवार कोण?; अमित शाह यांना सवाल करत बच्चू कडूंचा हल्लाबोल

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांनाच सवाल करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार कोण आहेत, असा परखड सवाल बच्चू कडू यांनी शहा यांना विचारला आहे.

शरद पवार हे सरदार आहेत, असे तुम्ही म्हणत असाल तर मग अजित पवार कोण आहे, असे जनता विचारणार, ते सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत, असे विचारले जाईल. कदाचित अमित शाह हे विसरभोळे झाले असतील. ते बऱ्याचदा चुकीची विधानं करतात आणि मग ती अंगलट येतात, असा टोलाही बच्चू कडू यांनी शहा लगावला. राजकारणात सत्ता महत्त्वाची झाली आहे. भाजपला सत्ता महत्त्वाची आहे, मग ती कशीही मिळो, कुणालाही सोबत घ्यावे लागो, असे धोरण त्यांनी सत्तेसाठी स्वीकारले आहे.

शरद पवार हे राजकारणातले कच्चे खेळाडू नाहीत. त्यामुळे ते भाजपला चोख प्रत्युत्तर देतील. आता भाजपवाले अनेक आश्वासने, आमिषे देत आहे. मात्र, आम्ही जर तरवर विश्वास ठेवत नाही. दूध का दूध, पानी का पानी हे मतदार ऑक्टोबर महिन्यात दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.