राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. ते मुंबईत उपोषण करणार आहेत. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे सरकारच्या दारात येऊ लागताच सामाजिक सर्वेक्षणाचे आदेश देणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केला. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश सरकारने याआधीच द्यायला हवे होते. जरांगेंनी वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, सरकारने याकडे प्राधान्याने पाहिले नाही. आता मात्र आंदोलक मुंबईच्या दारात येऊ लागताच सरकारने घाईगडबडीने आदेश दिले. इतके दिवस अन्य गोष्टींसाठी सरकारकडे वेळ होता, मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने हाताळला नाही. यातून सरकारचा नाकर्तेपणाच दिसून येतो. आताही लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा निर्णय देऊ नये, तर सरकारने समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायला हवे. अन्यथा समाजावर फार मोठा अन्याय होण्याची शक्यता आहे, असेही पाटील म्हणाले.
आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली आहे. यानुसार या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ते ईडी कार्यालयात जाणार आहेत. ही नोटीस जाणीवपूर्वक देण्यात आली आहे, असे दिसून येते. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही आंदोलन करण्याच्या अधिकृत सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, कोणी उत्स्फुर्तपणे आंदोलन करत असतील तर त्यालाही विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.