विखेंच्या अडचणीत वाढ, धनगर समाजाकडूनही विरोध; धनगरविरोधी असल्याचा यशवंत सेनेचा आरोप

नगरमध्ये राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना पक्षातूनच विरोध होत असताना आता त्यांना धनगर समाजानेही विरोध केला आहे. त्यांच्याविरोधात जाहीरसभा घेणार असून ते कसे धनगरविरोधी आहेत, हे स्पष्ट करणार असल्याचे यशवंत सेनेने म्हटले आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व येथील खासदार सुजय विखे हे धनगर विरोधी आहेत, त्यांनी समाजाविरोधात काय केले हे आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. तसेच राज्य सरकारने धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केली, असा हल्लाबोल यशवंत सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब दोलताडे यांनी केला. ते नगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे सातत्याने धनगर समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विखेंच्या विरोधात यशवंत सेना धनगर समाजाचा जाहीर मेळावा घेणार आहे. विखे पाटील हे कसे धनगर विरोधी आहेत, हे पुराव्यानिशी दाखवून देणार आहेत,’ असे ते म्हणाले. मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासाठी 30 दिवस आंदोलन केले. त्याचबरोबर धनगर समाजाने सुद्धा आरक्षण मिळावं, याकरता आंदोलन केलं. सरकारने विशेष अधिवेशन बोलून 10 टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जी सरकारने कमिटी नेमली, त्या कमिटीच्या अध्यक्षपदी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती केली. तीन महिन्यांमध्ये अहवाल देण्यापासून त्यांना थांबवलं, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तुम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं. मात्र धनगर समाजाला काही दिले नाही, असेही ते म्हणाले.

आता निवडणुकीच्या तोंडावर ते मते मागत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी दिलेली नाही. राज्यात अडीच कोटी जनता धनगर समाजाची आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असतानाही त्यांनी आमच्या समाजाला उमेदवारी दिलेली नाही. महायुतीने 48 जागांपैकी एकही धनगर उमेदवार दिला नाही, म्हणजेच यांना धनगरांविषयी आस्था नाही. उलट या सरकारला धनगरंबद्दल द्वेष आहे, असा आरोपही त्यांनी केला. धनगर समाजाच्या द्वेष करणाऱ्या या सरकारविरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशवंत सेना 15 जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा मोठा महामेळावा घेऊन या जिल्ह्याच्या पालकमंत्री विखे हे धनगरांची कसे विरोधक आहेत, त्यांनी काय केलंय, धनगर संपवण्यासाठी कसे काम केले आहे, हे देखील सांगणार आहे, असेही ते म्हणाले.