अधिकारी, मतदार यांना बूथमध्ये चपला घालून प्रवेशास मनाई करा; उमेदवाराच्या मागणीने मोठा पेच

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या परिसरात कोणत्याही उमेदवाराचा प्रचार होईल, असे कृत्य करण्यास मज्जाव असतो. तसेच कोणत्याही पक्षाच्या चिन्ह नेण्यासही बंदी असते. आता आचारसंहितेच्या या नियमामुळे धाराशीवमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर यक्ष प्रक्षप्रश्न उभा ठाकला आहे. येथील एका उमेदवाराला चपला हे चिन्ह देण्यात आले. या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. त्यावर आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याबाबच उत्सुकता आहे.

धाराशीव येथील गुरुदास संभाजी कांबळे ( 243 परंडा विधानसभा क्षेत्र अपक्ष उमेदवार निशाणी चप्पला) यांनी याबाबत पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी गुरुदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 12 निशाणी चप्पल आपणास कळवू इच्छितो की सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बुथपासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की माझी निशाणी चप्पला असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून 200 मीटरच्या आत आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दिनांक 20/11/2024 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. कारण चप्पल ही माझी निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो व आचार सहिता भंग होणार याच्यात शंकाच नाही. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी पत्रामध्ये केली आहे.

धाराशीव येथील गुरुदास कांबळे यांनी लिहीलेल्या या पत्रामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.