विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र मोदींची सत्ताही जाईल, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोले यांच्या प्रचाराचा धडाका सुरु असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे महविकासाघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नाना पटोले बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, तेलंगणाचे आमदार राममोहन रेड्डी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर, संदेश चव्हाण, तातू देशमुख, नंदा अग्रवाल, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देऊ तसेच सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करेन असे आश्वासन दिले होते. पण सत्तेत येतात नरेंद्र मोदींनी ते सर्व चुनावी जुमले होते असे सांगत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आता देवेंद्र फडणवीस मोदींसारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत, सत्तेत आलो तर शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा करत आहेत. 11 वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, मागील 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, याकाळात त्यांनी केले, हे आधी सांगावे, बळीराजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपाच्या या थापेबाजाली बळी पडणार नाही, असे पटोले म्हणाले.
विधानसभेची ही निवडणूक महत्वाची आहे, महाराष्ट्राला भाजपायुती सरकारने संकटात लोटले असून शिंदे, फडणवीस व अजित पवार यांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शाह यांना महाराष्ट्र लुटून देण्याचे पाप केले आहे, महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजपा युती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांने यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये कुणबी समाजाचा कुत्रे म्हणून अपमान केला. अशा मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.