तब्बल 3 वर्षांपासून बेपत्ता असलेला वृद्ध मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला; कुटुंबियांकडून तक्रार दाखल

महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिण आणि लाडक्या भाऊ योजनेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आणल्याचा आरोप होत आहे. या फसव्या योजनेसारख्या महायुती सरकारच्या जाहिरातीही फसव्या असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले वृद्ध थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ च्या जाहिरातीत झळकले आहेत. त्यामुळे महायुती सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच विरोधी पक्षांनीही या फसव्या जाहिरातीबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच या वृध्दाच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

सरकारने नुकतीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेबाबत केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर ज्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला आहे, ती व्यक्ती 3 वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे महायुती सरकारची योजना फसवी असल्याची चर्चा होत आहे.

गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून बेपत्ता होते. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नव्हते. मात्र, आता तीन वर्षानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर झळकल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर तांबे यांचा मुलगा भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, आमचे वडील तीन वर्षांपासून बोपत्ता होते. आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते., आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसत आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंतीही तांबे यांच्या पुत्राने केली आहे. तसेच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. सरकार स्वतःची पाठ धोपटण्याच्या नादात एका कुटुंबाच्या भआवनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करत महायुतीच्या या जाहिरातबाजीवर संताप व्यक्त केला आहे.