अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाबरी पडली त्यावेळी आपण तिथे हजर होतो आणि तो आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्या विधानावर ओवैसींनी तीव्र आक्षेप घेत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 6 डिसेंबरला बाबरी पाडली तेव्हा ते तिथे होते आणि तो दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता. तुम्ही एका घटनात्मक पदावर आहात. उपमुख्यमंत्री आहात. राज्यघटनेवर तुम्ही शपथ घेतली आहे. असे असताना तुम्ही म्हणताय बाबरी पाडली हे खूप चांगले काम झाले. तुम्ही हे जनतेला भडकवण्याचे काम करत नाहीयेत का? उपमुख्यमंत्री असून तुम्ही ही असली निरर्थक भाषा करत आहात. जर तुम्हाला आता एवढी हिंमत आली असेल, तर मग न्यायालयात जाऊन तुम्ही मान्य करायला हवे होते की तुम्ही मशीद तोडली. तुम्ही घाबरून तसे सांगितलं नाही. त्यामुळे त्या प्रकरणात कुणाला शिक्षा झाली नाही, असेही ओवैसी म्हणाले.
तुमच्यात हिंमत असेल तर न्यायालयात जाऊन तुमच्या गुन्ह्यांची कबुली द्या ना. तुरुंगात जायला तुम्ही घाबरत का आहात? मोदी सरकारने त्या निकालाविरोधात अपीलच केले नाही. एकनाथ शिंदे म्हणतात गेल्या 200-300 वर्षांपासून अस्तित्वात असणारा एक दर्गा आम्ही हटवून टाकू. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्या नजरेत सगळे सारखेच असायला हवेत. मग तो कोणत्याही धर्माचा असो. पण तुम्ही एका समाजाबाबत अशा निरर्थक गोष्टी बोलत आहात, अशा शब्दांत ओवेसींनी शिंदे यांनाही लक्ष्य केले आहे. बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यामुळेच हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांची हिंमत वाढली आहे. त्यामुळेच हे अशा प्रकारच्या भावना भडकवणाऱ्या गोष्टी बोलत आहेत, असेही ओवैसी म्हणाले.