सरकारनं माझ्याविरोधात ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले

गेली अनेक वर्षे मराठ्यांनी वाट पाहिली. आरक्षणासाठी आमच्या अडीचशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केली आहे. आमच्या आई बहिणीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले आहे. आमच्या माताभगिनींची डोकी फुटलीत. अनेक मुले अडीच महिने रुग्णालयात होती. आता सरकारने भानावर यावे. आमच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, तर कठीण होईल. आता मराठे संतापलेत. 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारने माझ्याविरोधात ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावले आहे.

मराठा समाज जो मुंबईला येणार आहे त्यांना 20 तारखेला अंतरवाली सराटी येथून निघायचे आहे. जे येणार नाहीत त्यांनी सर्वांना सोडण्यासाठी यावे. सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडावे. सरकार आपल्याला येड्यात काढायला निघाले आहे. कुणीही उद्रेक, जाळपोळ करू नये. जर कुणी करणार असेल तो आमचा माणूस नाही. घरी कुठल्याही मराठ्यांनी थांबू नये. ताकदीने रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे असे त्यांनी समाजाला सांगितले.

कोणकोणत्या मंत्र्याने माझ्याविरोधात ट्रॅप रचलाय ते मला माहिती आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कुणी विरोध केला, कुणी नाही केला हे सगळे माहिती आहे. 20 जानेवारीच्या आंदोलनात कोणता मंत्री सहभागी होतोय आणि किती लोकांना घेऊन सहभागी होतोय हे बघायचे आहे. जो या आंदोलनाला येणार नाही त्याने लक्षात ठेवावे, ही सगळी मराठ्यांची फसवणूक चालली आहे. मराठवाड्यात एकही मराठा नाही सगळेच कुणबी आहेत. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याशिवाय तुमचे माझे जमणार नाही. सरकारच्या आमदार, मंत्र्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्यात काही असंतुष्ट आत्मे आहेत त्यांना हाताखाली घेतले आहे. लातूर, संभाजीनगर, पुणे याठिकाणचे मंत्री आहेत. मराठ्यात फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

लाखोंच्या संख्येने मराठा बांधव माझ्यावर विश्वास ठेऊन आहे. तुमच्याशी मैत्री करायला मी येत नाही. मुंबईत आल्यावर माझ्यावर गोळ्या घातल्या तरी माझे विचार मरू देऊ नका, हे माझे मराठ्यांना आवाहन आहे. आंदोलन शांततेत करायचे पण संपूर्ण राज्य बंद दिसले पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. सरकारला 7 महिने वेळ दिला. तुम्ही 1 वर्षात काहीच करू शकला नाही. मी जर त्या मंत्र्यांचे नाव घेतले तर त्याचा राजकीय सुपडा साफ होईल. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.