आडकाठी करू नका, जड जाईल! आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक देणार आहेत. मुंबईत ते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी मुंबईत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या पदयात्रेदरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहने अडवली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. मी शंभर टक्के खात्री देतो की, या पदयात्रेला आडकाठी होणार नाही. परंतु, आम्हाला याआधी काही वाईट अनुभव आले आहेत. अंतरवालीत पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा दाखला देत मनोज जरांगे म्हणाले, याआधी काही वाईट अनुभव आले आहेत, त्यामुळे आम्ही आधीच सज्ज आहोत. आम्ही जाहीर केले आहे की, सरकारने अंतरवालीसारखा प्रयोग पुन्हा करण्याचे स्वप्न पाहू नये. तसे केल्यास सरकारला हे प्रकरण जड जाईल. मराठे आंदोलनासाठी, उपोषण करण्यासाठी शांततेत येत आहेत. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. संयमाने चर्चा करून, मार्ग काढावा आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. बाकी कुठल्या प्रयत्नात पडू नये.

सरकारने अंतरवालीसारखा प्रयोग पुन्हा करू नये. आम्हीसुद्धा काही कमी नाही. तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा चारही बाजूने तयारी केली आहे. आम्ही शांततेत येतोय, परंतु, त्यांनी अडवलं तर तिकडचे-इकडचे सगळे मिळून चारही बाजूने आम्ही तयारी करून ठेवली आहे. आम्ही मुंबईत घुसल्यावर सरकारला कळेल की आम्ही काय आणि कशी तयारी केली आहे. आंदोलनात आमची संख्या आधी कमी असेल आणि नंतर ती वाढत कशी गेली हे हळूहळू त्यांच्या लक्षात येईल. आम्ही सहा महिने राहण्याची तयारी केली आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. हे आमचं शेवटचे आंदोलन आहे, असा इशाराही त्यांनी दिला.