मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई आम्ही सुरू केली आहे. 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार्या मराठ्यांना घेरण्याचे मनसुबे रचले जात आहेत. याद राखा, आमच्या गाड्या रोखाल तर! मुंबईकडे जाणारे दूध, भाज्या, अन्नधान्य थांबवण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला बजावले. मुंबईत आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारसोबत चर्चेची कवाडे बंद करण्यात येतील, असेही जरांगे यांनी सांगितले.
आंतरवाली सराटी येथे आज मुंबईत होणार्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी सरकारच्या ढिम्म कारभारावर कडाडून हल्ला चढवला. मराठा आरक्षणासाठी सरकारने वेळोवेळी मुदत मागितली. तब्बल सात महिन्यांचा अवधी देऊनही सरकार अजून आहे तिथेच आहे. सरकारने शब्द देऊनही पाळला नाही. त्यामुळे आता अधिक वेळ देणे शक्य नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी कोट्यवधी मराठे २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आंतरवाली येथून मुंबईकडे प्रस्थान करतील, अशी माहिती जरांगे यांनी दिली.
तर मुंबईची नाकेबंदी करू
आमच्या वाटेत काटे पेरण्याचे काम चालू आहे. मराठ्यांच्या गाड्या रोखणे, त्यांना इंधन मिळू नये असा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारने आगीशी खेळ करू नये. आमच्या गाड्या रोखल्या तर आम्ही मुंबईची नाकेबंदी करू. मुंबईकडे जाणारे दूध, अन्नधान्य, भाज्या, फळफळावळ थांबवण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मुंबईकर मराठ्यांवर जबाबदारी
आरक्षण घेण्यासाठी मुंबईत येणार्या समाजबांधवांच्या खाण्यापिण्याची सोय करण्याची जबाबदारी मुंबईकर मराठ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यासाठी वेगळे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
असे असेल नियोजन
मुंबईतील मराठा आंदोलनाच्या नियोजनासाठी तब्बल दीड लाख स्वयंसेवक सज्ज असून, त्यात तीन हजार महिला स्वयंसेवक आहेत. महिलांना आंदोलन करण्यासाठी स्वतंत्र मैदान असून, तेथे सगळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मैदानावर जागा न मिळाल्यास मराठ्यांनी रस्त्यावर जेथे जागा मिळेल तेथे आंदोलनासाठी बसावे. दीड महिन्याचे अन्नधान्य सोबत घेऊन जायचे असून, सामान संपले तर मुंबईत एका बाजूचा रस्ता खुला ठेवण्यात येणार असून, तो फक्त सामान आणण्यासाठी वापरता येणार आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी एक हजार वकिलांचे तर आरोग्य सुविधेसाठी पाच हजार डॉक्टरांचे पथक असेल. मुंबईला पायी दिंडीने जात असताना रस्त्याच्या कडेला असणार्या शेतातील गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येक आंदोलकाने घ्यायची आहे.
आमचाही गनिमी कावा
आंतरवाली ते मुंबई पायी प्रवासाचे किती टप्पे असणार, दररोज किती प्रवास करायचा, कुठे मुक्काम राहणार याबद्दलची सर्व माहिती १० जानेवारीला देण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. सरकार आमच्याशी गनिमी कावा करते मग आम्ही का करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. सरकारने ट्रॅक्टरमालकांना नोटिसी दिल्याने आमचाच फायदा झाला असून, आता मालक दोन-दोन ट्रॅक्टर घेऊन मुंबईकडे येणार आहेत असे ते म्हणाले.