राज्यात मराठा आरक्षणासाठी वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. आता त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याशी आरक्षणाबाबत चर्चा करून यातून मार्ग काढावा. जरांगे यांना काही झाले तर त्याला पूर्णपणे महायुती सरकारच जबाबदार असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळला नाही. आता राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांचे उपोषण थांबवले पाहिजे. जरांगे यांचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. राज्य सरकारने तातडीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करुन उपोषणाबाबत तोडगा काढावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला करुन सरकारने आशादायक चित्र निर्माण केले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नवी मुंबई येथे बैठक झाल्यानंतर एक आनंदी वातावरण निर्माण झाले होते. पण आता कुठेतरी सरकारने दिलेला शब्द मोडल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर असला तरी तो त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही. हा प्रश्न आज ना उद्या सुटेल, नवं सरकार आल्यावर सुटेल. पण माझी जरांगे-पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी वैद्यकीय उपचार घेऊन उपोषण तात्काळ स्थगित करावे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.