मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे यांनी अल्टीमेटम दिला आहे. आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत देऊ केली आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे हे नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि गावातील आंदोलक यांच्या मदतीने उपोषण सोडणार आहेत.
आचारसंहिता लागेपर्यंत आपण राजकीय भाष्य करणार नाही, असेही जरांगे म्हणाले. आपल्याला त्रास देणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. फडणवीस तुमच्या हाताने सत्ता पाडू नका, मी काहीच येऊ देणार नाही, नंतर बोंबलु नका असेही जरांगे पाटील म्हणाले. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही. मात्र, आरक्षण दिलं नाही तर सत्तेत जात आरक्षण घेणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
आचासंहिता लागेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठ्यांनी खचून जाऊ नये, सरकारने आपल्याशी धोका केला तर तुम्ही आपल्या लेकरांना धोका देऊ नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पक्षाच्या नेत्यांच्या पोरं मोठे करण्याच्या नादाला लागून आपल्या लेकरांचे वाटोळं करू नका. अडाणी का होईना आपले लोक सभागृहात पाहिजे असंही ते म्हणाले. आरक्षण नाही दिले तर सत्तेत जाऊ, असेही जरांगे यांनी सांगितले.