आत टाकून दाखवाच, तुमचा सगळा सुपडा साफ होईल; मनोज जरांगे यांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. फडणवीस पोलिसांचे कान फुंकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल, असे आव्हान मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिले.

मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. माझ्या उपोषणाचा 15 वा दिवस असताना 22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने 13 मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून 23 फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, मनोज जरांगेला 10 टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझी मान जरी कापून नेली, तरी मी एक इंचभर मागे हटणार नाही. पण त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे देवेंद्र फडणवीस यांना दाखवून देऊ. त्यांचा सगळा सुपडा साफ होईल. या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप भाजपकडून केला जातो. पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, शरद पवार यांचा आंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला. तुम्हीच एका तोंडाने बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याचे सांगता. पण आमच्या मागे-पुढे कुणीही नाही, असेही जरांगे स्पष्ट केले.