हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे सतत नुकसानीला सामोरे जाणाऱ्या आंबा बागायतदारांसाठी मिंधे सरकारने कोणतीही ठोस मदत केलेली नाही. आंबा बागायतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांना जाहीर पाठींबा दिला. पावस परिसर हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पावस परिसर हापूस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी म्हणाले की, गेले काही वर्ष आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. 2015 पासून थकीत कर्ज असलेल्या आणि नियमित कर्ज असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 9 हजार 747 आहे. थकीत कर्जदारांची संख्या 11 हजार 326 असून 223 कोटी 86 लाख रुपये कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आमची मागणी होती. मात्र या सरकारने आंबा बागायतदारांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले.
2022-23 या वर्षात आंबा पीक 10 ते 12 टक्के आले होते. मात्र शासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नसल्याची खंत साळवी यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदारांना पीक विम्याचेही पैसे मिळाले नाहीत. तसेच माकडांकडून होणाऱ्या त्रासाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. येथील पालकमंत्री आणि सरकारकडे आम्ही वारंवार मागणी करुनही आंबा बागायतदारांचे प्रश्न सुटले नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी आंबा बागायतदारांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही आंबा बागायतदार संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे असे सांगितले. आंबा बागायतदार सुदर्शन तोडणकर यांनीही आपली स्पष्ट भूमिका मांडली. सध्याच्या सरकारने बागायतदारांकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संतोष पोकडे, दीपक राऊत, रवींद्र मांडवकर, अमृत पोकडे, अविनाश गुरव, सचिन भातडे, प्रमोद तिवरेकर, भास्कर मुकादम, शोएब काजी आणि इतर बागायतदार उपस्थित होते.