नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, इंधन महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरीविरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला अधिकार नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, डॉ. अभय पाटील, हिदायत पटेल, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश लोणकर, हरिभाऊ भदे, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमनकर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे सरकार आले तर नदीजोड प्रकल्प करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती. पण 2014 ते 19 भाजपाचे सरकार होते त्यानंतर अडीच वर्षांचे सरकार होते पण फडणवीसांनी ते काम केले नाही. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांची ही संकल्पना असून महा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा नदीजोड प्रकल्प पुर्ण करु. 2019 साली काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. आता महाविकास आघाडीचे सरकार आले की जुनी पेन्शन लागू करू, 25 लाखांचा आरोग्य विमा, महिलांना 3 हजार रुपये, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी व शेतमालाला भाव देऊ, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.
निवडणुका आल्या की भाजपा हिंदू-मुस्लीम करून मते मागतो. जातीधर्मात फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा हा डाव आहे परंतु देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले आणि आजचे पंतप्रधान एक हैं तो सेफ हैं, म्हणत मते मागत आहेत. 10 वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत, मोदी हे देशातील आजपर्यंतचे सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील 67 हजार महिला बेपत्ता आहेत, बदलापुरच्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार केले, महिला मुली सुरक्षित नाहीत. भाजपाला सत्तेचा माज आला असून वणीमध्ये भाजपा नेत्यांने ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली. ओबीसी समाजाला कुत्रा म्हणणाऱ्या भाजपाला आता मतदानातून अद्दल घडवा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.