राज्यात विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून विविध पक्ष जागांवर दावे करत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच या वक्तव्यातून त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
आग्रह केल्यानंतर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे जयंत पाटील म्हणाले. गोंदिया जिल्ह्यातील शिवस्वराज यात्रेत ते बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता त्यांना अजित पवार यांना हा टोला लगावला. अजित पवार यांनी काय बोलावे, यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत. कन्सल्टंट सांगतात त्यानुसार ते बोलतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार ते बोलतात, असेही पाटील म्हणाले.