लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान झाले आहे. या दोन टप्प्यात भाजपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळत नाही. पराभवाच्या भीतीमुळे अनेकजण उमेदवारी नाकारत असल्याची चर्चा आहे. राज्यातील आणि देशातील या राजकीय परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सर्वसामान्य जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत साशंकता आहे. अनेकांनी आपल्याकडे ही शंका बोलून दाखवल्याचे ते म्हणाले.
आपण अनेकांशी संपर्क साधत आहोत. जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. भाजपविरोधात जनतेत रोष आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीने सत्ताधारी असहाय्य आणि अस्वस्थ झाले आहेत. त्या नैराश्यामुळे ते सातत्याने वैयक्तिक आरोप करत आहेत. पण लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे चिंता करण्याचे नाही, असेही शरद पवार म्हणाले.
आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो. अनेकजण मला म्हणतात की, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, पण तेवढं ते ईव्हीएम मशीनचे बघा. या मशीनबाबत लोकांच्या मनात आजही शंका आहे. जनतेप्रमाणेच अनेक पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत आजही शंका असल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत बारामतीला मी एकच सभा घेतली. ती प्रचारसभेचे नारळ फोडण्यासाठी घेतलेली सभा होती. अनेक वर्षांपासून लोकांशी संवाद सुरू आहे, तो आजही आहे. त्यामुळे लोकांची साथ आम्हाला मिळेत आहे. जनमत आमच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीचा विजय होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची मानसिकता वेगळी असते. सुप्रिया सुळे खासदार म्हणून प्रभावी आहेत. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे काम देश पातळीवर नावाजलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री आहे, असेही शरद पवार म्हणाले.