
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पाचव्या टप्प्यातील उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या दोन दिवसात सरकारकडून फोन आला नाही, चर्चाही झाली नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात एकही भाजपचा आमदार निवडून यायला नको. मला त्यांनी जेलमध्ये टाकलं तर कोणी खचायचं नाही, मी नसलो तरी यांचा कार्यक्रम लावायचा, अशा शब्दांत समजाला मार्गदर्शन करत जरांगे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरेकर तमाशातील नथ नसलेली मावशी आहेत. मला महिती आहे, दरेकर मला कसं बदनाम करणार आहेत? चल तुला काय करायचं कर, मी मरायला तयार आहे. तुझ्या डोक्यात फक्त एकच भूत घुसलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि सत्ता, असे सांगत जरांगे यांनी दरेकर यांच्यावरही निशाणा साधला. हे मला कधीही जेलमध्ये टाकू शकतात, निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर. मात्र, महाराष्ट्रात एकही भाजपचा आमदार निवडून यायला नको. मला जेलमध्ये टाकलं तर कोणी खचायचं नाही, मी नसलो तरी यांचा कार्यक्रम लावायचा. जातीपेक्षा नेत्याला आणि पक्षाला मोठे मानणारे लय उतावळे आहेत. ते मुजोर झाले आहेत. महाराष्टातील मराठा समाजातील मुलांचा अपमान केलाय. जत्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं वाटू नका, त्यांना आयुष्यभराचं द्या, असेही जरांगे म्हणाले.
तुम्ही माझा नाद करू नका. तुम्ही माझ्या विरोधात अभियान सहा महिन्यापासून सुरू केलं आहे. मला निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर गुंतवणार आहे, मला सर्व माहिती आहे, असेही जरांगे म्हणाले. दरेकर मराठ्यांची लोक फोडायला लागला, आमिष द्यायला लागला, देवेंद्र फडवणीस पाहिजे फक्त दरेकर यांना. मला आपली लेकरं महत्वाची आहेत. भाजपमधल्या मराठ्यांनी आता जागे होण्याची वेळ आहे.दरेकर फडणवीस यांचं ऐकून अभियान सुरू करणार आहे. मला आणि समाजाला राजकारण करायचं नाही, आमच ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, असेही जरांगे यांनी ठणकावले.
नाकातल्या नाकात गुणगुण करू नका, अजित पवार यांनाही फटकारले
अजित पवार टेबलाखाली बसून गप्पा मारू नका. उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. शिष्टमंडळ येतात जातात आमची चहा बिस्कीट खातात, त्याची उधारी कोणी द्यायची. शिष्टमंडळाने काय केलं विचारलं का? असा सवालही जरांगे यांनी केला.