शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपुर्वी कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम

सरकारने शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपुर्वी कर्जमुक्त करावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही कर्जमुक्ती कशी होत नाही, हेच पाहतो, असा इशाराही जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. सरकारने 30 सप्टेंबरपुर्वी शेतकऱ्यांची कायमची कर्जमुक्ती करावी, सगळा पिकविमा, अनुदान द्यावे. आता शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो, असेही जरांगे म्हणाले.

आता आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न हाती घेतला आहे. शेतकरी म्हणजे आपणच, आपण अजून किती दिवस फसायचं, आम्हाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती करा कायमची. कर्जमुक्ती केल्यानंतर कर्जही देऊ नका. शेतकऱ्यांना ज्या सुविधा लागतात त्या द्या. कायमची वीज द्या, पाण्याची सुविधा करा, अशी मागणीही जरांगे यांनी केली. शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी आत्महत्या होणारच नाहीत, असेही जरांगे म्हणाले.

पिक विमा भरल्यावरही शेतकऱ्यांना तो मिळत नाही. सरकारचा या कंपन्यांवर धाक नाही. सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या कंपन्याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकार म्हणते कंपन्या बाहेरच्या आहेत. त्या कंपन्या देशाबाहेरच्या आहेत का ? तुम्हाला तिकडे जाता येत नाही काय? शेतकऱ्यांना अजून किती फसवणार, असे सवाल करत जरांगे यांनी सरकारवरही हल्लाबोल केला.

आगामी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगे यांनी संकेत दिले आहेत. याबाबतच्या आवाहनानंतर इच्छुकांचे 700 ते 800 अर्ज आले आहेत. त्यांची छाननी सुरू आहे, आणखी काही इच्छुक भेट आहेत, असेही जरांगे म्हणाले. ही गोरगरीब समाजाची लढाई आहे. जातीधर्माच्या विरोधात ज्यांनी काम केलं, त्यांना पश्चाताप होत आहे. मराठ्यांच्या मताशिवाय कोणताही पक्ष निवडून येऊ शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे, असेही जरांगे यांनी सांगितले.