राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर निवडणुकीत मराठा समजाचे उमेदवार उभे करण्याबाबतचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यावर परत जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना ते देऊ देत नाहीत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर मराठा आरक्षणामध्ये जर मी अडथळा ठरत असेन तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी फडणवीसांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखलं आहे, असा दावाही केला आहे.
आम्ही तुम्हाला विरोधक समजत नाही, हे तुम्ही का समजून घेतले पाहिजे. तुम्ही या राज्यकर्ते आहात. आता तुम्ही इतक्या हताशपणे राजीनामा देईन, असं म्हणत आहात. आता मराठ्यांविरोधात गेल्याचा पश्चाताप तुम्हाला होत आहे. तुम्ही राजीनामा देईन म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळ विनंती आहे की, तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही द्या ना. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, त्याची अंमलबजावणी करा. मी कुठलेही आढवेढे घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्यकर्ते आहात. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्या, असे जरांगे यांनी म्हटले आहे.