मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने दिवसाढवळ्या मराठा समाजाची फसवणूक आणि धूळफेक केली, असा आरोप त्यांनी केला आहे. ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी 6 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकार निजामशाही, इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरिब मराठ्यांवर करत आहे. आता मराठे मागे हटणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जसजसं मराठ्यांवर दडपशाही, दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत. सरकारनं दिवसाढवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली. त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे. आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायेत हे बघतोय. चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याकडे कुणी आले नाही. मी बाहेर आलोय, कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप त्यांनी केला.
माझ्याविरोधात अहवाल तयार झाला आहे. आम्ही न टिकणारे 10 टक्के आरक्षण घेत नाही म्हणून गुन्हा नोंदवले जातायेत. सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाज हजारोने उमेदवारी अर्ज भरणार आहे. शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जरांगेंनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे.
माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही. गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायेत. मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे. मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय, अस्ही जरांगे पाटील म्हणाले.