EVM चा वापर जनतेला मूर्ख बनवण्यासाठी होत आहे; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल अनपेक्षित आले आहेत. या निकालाबाबत अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनमधील हेराफेरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत अनेक उमेदवारांनी ईव्हीएमबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मतमोजणीत गडबड झाल्याचे सांगितले आहे. तसेच याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीनंतर पक्षाचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी EVM बाबत संताप व्यक्त केला.

जम्मू कश्मीर आणि हरयाणाच्या निवडणुकीवेळी त्यांनी जम्मू हे छोटे राज्य विरोधकांना दिले आणि हरयाणा हे राज्य स्वतःला घेतले. आता झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत झारखंड हे लहान राज्य विरोधकांना दिले आणि महाराष्ट्रसारखे मोठे राज्य स्वतःकडे ठेवले. त्यामुळे विरोधीपक्ष आणि जनता ईव्हीएम संशय व्यक्त करू शकणार नाही. ईव्हीएममध्ये गडबड आहे, तर या राज्यात तुमचा विजय कसा झाला, असे प्रश्न ते करतात. मात्र, ईव्हीएमचा वापर जनतेला मूर्ख बनवण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अमेरिकेसारख्या प्रगत देशातही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येते. आपला देश अमेरिकेपेक्षाही प्रगत आहे का? ईव्हीएमचा वापर करत भाजम मोठी राज्य स्वतःकडे ठेवत आहे. तसेच विरोधकांनी आवाज उठवू नये, यासाठी छोटी राज्ये विरोधकांनी देण्यात येत आहेत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.