महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे दहा हजार होमगार्ड; निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये  सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध असताना गुजरातमधील तब्बल दहा हजार होमगार्ड आणल्याचे समोर आले आहे. एकीकडे मिंधे-भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राला मिळणारे पाच लाख रोजगार गुजरातला पळवले असताना आता महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे होमगार्ड आणल्याने निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून भाजपने 90 हजार कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात आणल्याची माहिती खुद्द भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली होती. यामुळे भाजपचा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. असे असताना तब्बल दहा हजार होमगार्ड आणल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या वलसाड जिह्यातील 250 होमगार्ड जवानांना धुळे जिह्यात निवडणुकीसाठी तैनात केले. तसेच अनेक जिह्यांमध्ये गुजरातचे होमगार्ड दिसले.