महायुतीत जागा वाटपावरून जुंपली; जागांवर दावे- प्रतिदावे, आरोप- प्रत्यारोप सुरुच

ajit-pawar-shinde-fadnavis

राज्यात विधानसभोच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी महायुतीमध्ये जागावाटपावरून आतापासूनच जुंपली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपचे नेते अनेक जागांवर दावा सांगत असून त्यावर दुसऱ्या गटाकडून प्रतिदावा करण्यात येत आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी यावर कोणत्याही नेत्याने जाहीरपणे वक्तव्य करू नये, अशा सूचना देण्यात आल्या असल्या तरी महायुतीतील घटकांकडून दावे- प्रतिदावे, आरोप-प्रत्योरप सुरुच असल्याचे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उफाळून येत आहे.

विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये, अशा सूचना वारंवार करण्यात येत आहे. मात्र, जागावाटपावरून दावे करणे महायुतीतील नेते थांबवत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचा पक्ष 120 जागा लढवेल आणि 100 निवडून आणेल, अशी दर्पोक्ती केली. त्यावर गायकवाड यांनी असे वक्तव्य करू नये, त्यांना तो अधिकार नाही. महायुतीतील तिन्ही नेतेच यावर योग्य निर्णय घेतील, असे सांगत त्यांचा आवाज बंद करण्यात आला. या घडामोडीवर शिंदे गटाचे काय ते तीनशेही जागा निवडून आणतील, पैशाच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते, असा जबरदस्त टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमच्या पक्षाला 85 जागा मिळायला हव्यात, असा दावा केला. आताच आमच्याकडे 60 आमदार आहेत, आणखी वीस-पंचवीस तरी जागा आम्हाला वाढवून मिळायला हव्यात, असे ते म्हणाले. शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून जागांवर दावे करण्यात येत असताना सर्वात मोठा पक्ष आमचाच असल्याने आम्हालाच जास्त जागा मिळायल्या हव्या, असा सूर भाजपमध्ये उमटत आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील जागावाटपाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.