राज्यात अद्याप विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यात नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल असल्याचे दिसून आल्याने आहे, त्या जागा वाचवण्यासाठी भाजपची खटपट सुरू आहे.
भाजपने मिंधे गट आणि अजित पवार गटाला सोबत घेतल्याने भाजपच्या निष्ठावतांमध्ये नाराजी आहे. पक्षांच्या अनेक नेत्यांनीही मनावर दगड ठेवत ही युती केल्याचे वक्तव्य जाहीरपणे केले आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापुर्वीच महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबरदस्त फटका बसला. जनतेला भाजप आणि महायुतीला नाकारले आहे.
लोकसभेच्या या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडण्यात आले. तसेच अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट झाली. या भेटीचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तसेच भाजपकडून सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर अजित पवार गट वेगळी चूल मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिंधे गटातही जागा मिळवण्यासाठी दावे करण्यात येत आहे. त्याचे अजित पवार गट आणि भाजप खंडन करत आहे. सध्या प्रत्येक गटाकडे असलेल्या जागा त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला तर निष्ठावतांची नाराजी वाढणार आहे.
सर्वाधिक जागा असूनही मिंधे आणि अजित पवार गटाशी युती केल्याने जागावाटपात भाजपची गोची होणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मिंधे आणि अजित पवार गटाला सोबत घेतल्याने पक्षातील नाराजी बंडखोरीच्या रुपात व्यक्त होऊ शकते. त्यामुळे पक्षातील निष्ठावतांना सांभाळणे आणि मिंधे आणि अतिज पवार गटाला जागा देणे असे दुहेरी आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील जागावाटप, श्रेयवाद आणि इतर मुद्द्यांवरील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.