राज्यातील मंत्रिमंडळाचा अखेर रविवारी विस्तार झाला. यावेळी महायुतीच्या 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 तर शिंदे गटाच्या 11 तर अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसलेल्या नेत्यांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे.
नाराज असलेल्या नेत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांची आहे. या दोघांनीही उघडपणे आपली नाराजी आणि मनतील खदखद व्यक्त केली आहे. सुधीर मुनगंटीवार नागपुरात असूनही त्यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा होती. तसेच त्यांनी भाजपचे ज्येश्ठ नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीवरूनही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क करण्यात येत आहेत. तसेच आपल्याला मंत्रीपदाचा शब्द दिला होता. तो पाळण्यात आला नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. आपला पक्षात अपमान झाला आहे. त्या अपमानाने दुःखी झालो आहे, तसेच त्यांना मी काय त्यांच्या हातातले खेळणे वाटलो काय, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशी अनेक मंत्रीपद आली आणि गेली मात्र भुजबळ संपलेला नाही, असे सांगत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
यासोबतच मंत्रीपद मिळाले नसलेल्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मिंधे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खातं होतं. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोडेंकर, रवी राणा हे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापैकी मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. आता महायुतीतील हे नाराजीनाट्य सुरूच राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.