
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपने एवढी वर्षं संघर्ष केला. तरीदेखील अजित पवारांना भाजपने सोबत का घेतले, अशी विचारणा भाजपच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ध्येयाकडे जाताना काही तह, सलगी करावी लागते. कधी दोन पावले पुढे, तर कधी दोन पावले मागे यावे लागते, असा खुलासा करण्याची वेळ आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपमधील संघाच्या परिवार घटकाकडून लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाबद्दल अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याचा परिणाम असल्याची टीका होत आहे. संघाचे ऑब्झर्व्हर आणि विवेक या नियतकालिकांमधून भाजपवर टीका करण्यात आली होती. भाजपच्या प्रदेश अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्दय़ावर स्पष्टीकरण दिले.
पब्लिक मेमरी शॉर्ट असते…
काल बोललेलं लोक आज विसरतात. पब्लिक मेमरी शॉर्ट असते. त्यामुळे लोक पंटाळले तरी चालतील. सरकारी योजनांचा मारा करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱयांना केले. यापुढे उत्तर देण्यासाठी तुम्हाला कोणाच्या आदेशाची गरज नाही. मैदानात येऊन उत्तर द्या आणि विरोधकांना ठोकून काढा, असे सांगून अप्रत्यक्षपणे विरोधकांना धमकी दिली.
गडकरींची अनुपस्थिती; चव्हाणांना कोपरा
भाजपच्या प्रदेश अधिवेशनामध्ये पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्घाटन सत्रात प्रमुख भाषण होणार होते. मात्र, गडकरी अधिवेशनाला अनुपस्थित होते. त्याची मोठी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱयांमध्ये होती. दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अधिवेशनामध्ये पहिल्या रांगेत स्थान देण्यात आल़े; परंतु त्यांना शेवटून दुसऱया क्रमांकाची कोपऱयातील खुर्ची देण्यात आली होती.