अनिल देशमुखांविरोधात कुभांड रचलं गेलं; जयंत पाटील यांचा मोठा दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकत्याच केलेल्या विधानांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कुभांड रचलं गेलं. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवत काही मागण्या करण्यात आल्या. लोकशाहीच्यादृष्टीने हे घातक असून याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्सवर जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात कुभांड कसे रचण्यात आले याबाबतचा व्हडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी स्वतःहून काही माहिती दिली आहे. त्यांना कोणकोण भेटायला आले, त्यांना काय प्रस्ताव दिले,याबाबत देशमुख यांनी प्रसारमाध्यमांसमोर माहिती दिली आहे. त्यामुळे देशमुख जे सांगत आहे, ते सत्य मानायला हवे. एखाद्याला अडचणीत आणून अशाप्रकारे ऑफर देणे, कितपत योग्य आहे, याचाही विचार होण्याची गरज आहे. देशमुख यांच्याविरोधात कुभांड रचण्यात आले. त्यांना मुद्दाम जाणूनबुजून अडचणीत आणण्यात आले. पैसे दिले नाहीत, घेतले नाहीत तरी त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आले. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. देशाची लोकशाही, न्यायव्यवस्था यासाठी ही काळजी करण्याची, चिंतेची बाब आहे. हा अनुभव अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सर्वांना आला असेल असेही पाटील म्हणाले.

बावनकुळेंकडे लक्ष देऊ नका!
जयंत पाटील यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. पक्षाच्या एक्स अकांऊटवर (प)’वारं’ सुसाट सुटलेले असताना दिवे लावणारे हे ‘शहा’णे नव्हे, ५२ खुळे असतात! अशी पोस्ट करण्यात आली आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, बावनकुळे यांच्यासाठी अमित शहा हेच सूर्य आहेत. त्यामुळे त्यांना असे वक्तव्य केले असावे. त्यांनी थोडीही हाचकाल केली तर त्यांचे काय होईल, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते अशी विधाने करतात, त्यामुळे बावनकुळे यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.