
मुंबईतील भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई काँग्रेस कमिटी महायुती सरकारविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय? असे रॅप साँग जारी करत महायुतीचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणला आहे. एकेकाळी आर्थिक समृद्धीसाठी स्वप्नांचे शहर म्हणून मुंबईची ख्याती होती. मात्र मुंबईचे जीवनमान महायुतीच्या काळात कमालीचे घसरले आहे. या आरोपपत्राद्वारे, काँग्रेसने मुंबईतील नागरिकांच्या वेदनेला आवाज दिला आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा हिशोब मागणे, महायुतीने दुर्लक्षित केलेल्या जनतेच्या प्रलंबीत समस्या आणि सतत धडकी भरवणाऱ्या गोष्टी जनतेसमोर ठेवण्याचा निश्चय या आरोपपत्रातून केला आहे.
आरोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे
जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या कारकिर्दीत मुंबईच्या अधोगतीला सुरुवात झाली. शिंदेंच्या नेत्याने निष्पाप मुंबईकरांना गाडीखाली चिरडले, हे सरकार आरोपपत्रही दाखल करू शकले नाही. 7 महिन्यांच्या कालावधीत, गुन्ह्यांचे प्रमाण 56% ने वाढले. एकेकाळी महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आता दररोज 3 बलात्कार आणि 6 विनयभंगाच्या घटना घडतात.
मुंबईत बेरोजगारीची ऐतिहासिक पातळी पाहायला मिळत आहे. तेव्हा सत्ताधारी मोठे प्रकल्प आणि गुंतवणूक गुजरातला पाठवत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला IFSC, डायमंड बोर्स आणि इतर असंख्य प्रकल्प नाकारण्यात आले आहेत.
सुशासनाचा दावा करणारे महायुतीचे चकाचक होर्डिंग गेल्या दोन वर्षांपासून बिना नगरसेवकांचे झळकत आहेत. दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी आणि प्रभावी प्रशासनापासून वंचित रहावे लागले आहे.
कोणत्याही आणि कोणाच्याही नियंत्रणाच्या शिवाय, बीएमसीने 6000 कोटी रुपयांचे रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतले आहेत जे मुंबईला खड्डेमुक्त करू शकले नाहीत. मुंबई लोकलच्या दयनीय अवस्थेबाबत तर न्यायालयाचाही रोष या सरकारने ओढवून घेतलाआहे. 2023 मध्ये लोकल ट्रेनच्या खराब स्थितीमुळे 2590 लोक मरण पावले, दर दिवशी 7 जणांचा मृत्यू लोकल दुर्घटनेत होतो, लोकं आपल्या जीवाला मुकतात. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 17 जणांचा बळी गेला आणि 74 लोक जखमी झाले तेव्हा सर्वसामान्य मुंबईकरांबाबतीत हे सरकार किती असंवेदनशील आणि क्रूर आहे हे दिसले.
महायुती सत्तेत आल्यापासून आरोग्याच्या पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था झाली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही, BMC संचालित आरोग्य सुविधा महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकांपैकी 19 व्या क्रमांकावर आहे. एकेकाळी चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी प्रतिष्ठित असलेल्या BMC रुग्णालयांमध्ये आज महत्वाच्या औषधे आणि आधुनिक वैद्यकीय साधनांचा तुटवडा आहे, याला या सरकारची खराब टेंडर वितरण करण्याची पद्धत जबाबदार आहे.
मुंबईसाठी काँग्रेसचा संकल्प
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, काँग्रेस मुंबईकरांचा आवाज बनून तुमच्या सोबत राहील. मुंबईकरांना पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्याचे वचन आम्ही मुंबईकरांना देत आहोत. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एनएसयूआयसह आमच्या विविध आघाड्या प्रत्येक मुंबईकरापर्यंत हे आरोपपत्र पोहचवण्याची मोहीम हाती घेणार आहेत. आमचा शब्द आहे महायुती सरकारचा पराभव झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. स्वार्थी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महायुती राजवटीचा पर्दाफाश काँग्रेस करणार आहे त्यापैकीच ‘आरोपपत्र’ एक आहे.