कॅमेरा बघताच पळाले आमदार जितेश अंतापूरकर…धापा टाकत दिली प्रतिक्रिया अन् काढला पळ

राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीत काँस वोटिंग झाल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. तसेच पक्षाशी बेइमानी करणाऱ्या आमदारांची नावे पक्षश्रेष्ठींना कळवली आहेत, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप होत होता. अंतापूरकर शनिवारी नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांचा कॅमेरा बघताच ते पळत सुटले. पळत जात गाडीत बसले, पत्रकारांनी विचरलेल्या प्रश्नावर धापा टाकत प्रतिक्रिया दिली आणि पळ काढला. त्यामुळे या घटनेचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत अंतापूरकर यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप होत होता. तसेच त्यांनी नुकतीच भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर जितेश अंतापूरकर भाजपसोबत जाणार का? असा सवाल करण्यात येत होता. अंतापूरकर शनिवारी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बघताच त्यांनी पळ काढला. अखेर माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना गाठत त्यांची प्रतिक्रिया विचारली.

गाडीत बसत धापा टाकत त्यांनी माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार आहे. क्रॉस वोटिंगच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण काँग्रेसमध्ये आहात का असे विचारल्यावर निश्चित मी काँग्रेसमध्येच आहे, असे सांगत त्यांनी पळ काढला. या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.