छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच; नितीन राऊत यांचे सूचक वक्तव्य

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने याची राजकी. वर्तुळात चर्चा होत आहे. या दोन नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क करण्यात येत आहे. या भेटीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. या भेटीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत दिली.

छगन भुजबळ महविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे. आजही भुजबळांची शरद पवारांशी घट्ट बांधिलकी आहे. त्यांच्यातील नातेबंध दृढ आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांचे स्वागतच असेल, असे राऊत म्हणाले. बारामतीत भुजबळ शरद पवारांबद्दल जे काही वेडेवाकडे बोलले, त्याबाबत त्यांना खंत वाटत असावी. शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली, त्या शरद पवारांबद्दल आपण असे बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी. त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावे, असे मतही राऊत यांनी व्य़क्त केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आजची भेट असावी, असे ही नितीन राऊत म्हणाले. येणाऱ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची आहे. या भेटीतून काही नवीन राजकीय दिशा निघते का आणि भुजबळ भविष्यात कोणत्या मार्गाने जातील, याबद्दल भुजबळच सांगू शकतील. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव दिसत आहे, असे सांगत राऊत यांनी सूचक वक्तव्य केले.