रुसलेल्या एकनाथ शिंदेंची ‘दांडीयात्रा’ अजूनही सुरूच, फडणवीसांच्या बैठकांबरोबर कार्यक्रमांकडेही पाठ; महायुतीत सरकारमध्ये शीतयुद्ध

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना दांडी मारून शिंदे यांनी स्वतंत्र बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारमध्ये आपल्या मनासारखे काहीच घडत नसल्याने रुसलेल्या शिंदे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांकडे पाठ फिरवून दांडीयात्रा सुरू केली आहे. याचा प्रत्यय शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दिसून आल्याने शिंदे गटाच्या नाराजीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारीला कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शिवाजी महाराजांच्या बाँझच्या पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम ठेवला होता. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे दोघांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण होते, पण कुठलाही इतर कार्यक्रम नसताना शिंदे यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळत दांडी मारली. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शिंदे यांनी काही काळ उपस्थिती लावली. यानंतर आंबेगावला झालेल्या शिवसृष्टी कार्यक्रमाचे निमंत्रण असतानाही जाण्याचे शिंदे यांनी जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा आहे.

आग्रा लाल किल्ला येथील कार्यक्रमाकडे पाठ

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून एकनाथ शिंदे येथील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले होते. मात्र शिंदे यांनी लाल किल्ला येथील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

कुळगाव-बदलापूरचा कार्यक्रम का टाळला?

कुळगाव-बदलापूर नगर परिषद ही ठाणे जिह्यात येते. एकनाथ शिंदे हे या जिह्याचे पालकमंत्री तर आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याअंतर्गत येत असणाऱ्या नगर परिषदेचा कार्यक्रम त्यांनी का टाळला? शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने महायुतीत धुसफुस सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.