राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राकडून झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. आता त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. सीआरपीएफच्या काही अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात चर्चा केली. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. या चर्चेनंतर शरद पवार यांना केंद्राकडून झेड प्लेस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येण्याची शक्यता आहे.
शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी ही सुरक्षा स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.