
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचा असलेला सहभाग आदी घटनांमुळे महायुती सरकारच्या कारभारचे धिंडवडे निघाले आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरून विरोधक सरकारला जाब विचारणार हे निश्चित. त्याचबरोबर फिक्सर पीए व ओएसडी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार याचा भंडापह्ड विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. मंत्री माणीकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा सुरू असलेला प्रकार यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाणार आहे.
अधिवेशनाच्या तोंडावरच पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरुणीवर दुर्दैवी अत्याचार झाला. या घटनेमुळे सरकारच अडचणीत आले आहे. त्यातच बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या फेक एन्काउंटर दडपण्याचा सुरू असलेला प्रकार, बीड जिह्यातील मस्साजोगच्या सरपंचाची हत्या व सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे गुन्हेगाराशी असलेले थेट संबंध यामुळे आधीच बॅकफुटवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांच्या आक्रमकतेचा सामना करावा लागणार आहे.
महायुतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर
रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. त्यातच शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांकडील खासगी सचिव, विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महायुती सरकारच्या स्थापनेपासून सत्ताधाऱ्यांत सुरू असलेली धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे.
कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोटय़ातील सदनिका लाटल्याप्रकरणी कोर्टाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तुर्तास या प्रकरणात कोकाटे यांना जामीन मिळाला असला तरी या प्रकरणातून त्यांची सुटका झालेली नाही. यामुळे कोकाटे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांकडून याबाबत सरकारला जाब विचारला जाणार आहे.
‘शक्ती’ विधेयक मागे
महिला अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ विधेयक मंजूर करून ते मंजुरीसाठी केंद्र सरकारला सादर केले होते, मात्र केंद्राने या विधेयकातील तरतुदी फेटाळून लावत राज्य सरकारला विधेयक मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ‘शक्ती’ विधेयकावरूनही विरोधी पक्षाकडून सरकारला जाब विचारला जाईल.
शेतकरी कर्जमाफी कागदावरच
राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कागदावरच राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. राज्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापर्यंत या प्रोत्साहनपर योजनेची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रोत्सहनपर योजनेच्या रक्कमेची तरतूद करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाण्याची शक्यता आहे.
मुंडेंसाठी सेफ गेम
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच या हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराडला एक नंबरचा आरोपी दाखवून धनंजय मुंडे यांना ‘सेफ’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच मुद्दय़ावरून मुंडे यांची कोंडी करून राजीनाम्यासाठी दबाव वाढविला जाणार आहे.
लाडक्या बहिणींना फसवले
महायुतीने विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील मदत महिना दीड हजार रुपयांवरून 2 हजार 100 रुपये करण्याची घोषणा केली होती, पण तिजोरीत खडखडाट असल्याने 2100 रुपयांची घोषणा कागदावरच राहिली आहे.
अदानीवरून घेरणार
कुर्ला येथील डेरीची जागा, मिठागरांची जमीन, मालाड येथील भूखंड कवडीमोल दराने अदानीला आंदण देण्यात आले. यावरून विरोधक सरकारला घेरणार आहेत.