
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सिरुवात केली आहे. तसेच विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. आम्ही जागांचा आग्रह धरणार नाही, राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी आमचे प्राधान्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. तर महायुतीत महाबिघाडी झाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये गटाच्या मेळाव्यात अजित पवारांनी याबाबतची घोषणा केली. लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाअजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच महायुतीत आलबेल नसल्याच्याही चर्चा होत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्याचे खापर अजित पवार गटावर फोडण्यात आले. तसेच अजित पवार यांना सोबत घेतल्याने पक्षाचे नुकसान झाल्याच्या चर्चाही भाजपत होत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार हे स्पष्ट झालं आहे.