जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

राज्यात विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट यांच्यात चुरशीचा सामना आहे. आंबेगावमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पक्षफोडी करणाऱ्यांवर गद्दारांवर चांगलाच प्रहार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आंबेगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी पक्ष फोडणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन केले. त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत त्यांनी गद्दारी केली आहे. जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असे ठणकावले. या निवडणुकीत वळसे पाटलांना पराभूत करा, असे सांगत देवदत्त निकम यांना विजयी करा, असे आवाहन केले.

ज्यांना मी पदं दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंबेगाव तालुक्याचं अन् माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध आहे. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं. मात्र, त्यांनी विश्वासघात केला, असंही शरद पवार म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं आवाहन शरद पवार यांनी केले.