महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणाचा विषय तातडीने हाती घ्या, नाहीतर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा सरकारला दिला होता. आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया देताना पहिल्यांदा तेच होते, आताही तेच आहे, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे, अशी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या समजासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते, यावर मनोज जरांगे म्हणाले, आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला नेहमी संकटच आले आहेत. 70-75 वर्षांत आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही.
आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरे मोठे करण्यासाठी आम्हाला लढावे लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भले होईल, असे आम्ही कधीही अपेक्षित धरले नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आले काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावेच लागणार, हे पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे.
आम्ही आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधी झाले नसेल असे मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.