माझ्याकडे गृहमंत्रीपद आलं तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, रोहित पवारांचा टोला

महाराष्ट्रात प्रचार शिगेला पोहचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पुराव्यासह महायुतीचे भ्रष्टाचार उघड करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ठणकावले. तसेच माझ्याकडे गृहमंत्रीपद आलं तर महायुतीतील 60 टक्के नेते गुवाहाटीला जाऊन राहतील, असा टोलाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोणीही गृहमंत्री झाला तरी महायुतीतील नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. सामान्य लोकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हा वायफळ जाणारा पैसा महायुतीचे नेते स्वतःचे घर भरण्यासाठी वापरत असल्याची टीकाही त्यांनी केला. कर्जत जामखेडमध्ये आयोजीत केलेल्या सभेत रोहित पवारांनी राम शिंदेंवरही निशाणा साधला. राम शिंदे कोणालाही चॅलेंज करा पण पवारांना करु नका, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. कर्जत- जामखेडमध्ये IPL च्या मॅचेस होणार का? असा सवाल राम शिंदे करतात. त्यावर रोहित पवार म्हणाले की, आम्हाला चॅलेंज करू नका, तुम्हाला IPL चे साधे तिकीट तरी मिळते का? ते पाहा असा टोलाही  रोहित पवार म्हणाले.

पाच वर्षात मी या मतदारसंघात जे काम केलं तो केवळ ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है, असेही रोहित पवार म्हणाले. कर्जत- जामखेडच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची दखल राज्याला घ्यावी लागली असेही ते म्हणाले. कर्जत- जामखेडचे वजन हे राज्यात वाढले आहे. भविष्यात कर्जत जामखेडमधूनच राज्यातील प्रमुख निर्णय घेतले जातील असंही रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस पहाटे शपथविधी करतात तसेच राम शिंदेंकडे प्रवेश हे रात्रीचे होत आहेत. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो.यापुढं आम्ही गद्दारांना सोडणार नाही असेही रोहित पवार म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावला तर त्यांचे हात छाटण्याचे काम आम्ही करु असा इशाराही त्यांनी दिला.

पवार साहेबांनी 10 वर्षात काय केलं? असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विचारले होते. जनता 23 तारखेला दाखवून देईल की, पवार साहेबांनी काय केलं ते असे रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा वाढल्या तर 200  आमदार निवडून येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.