राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, जागावाटपाबाबत महायुतीतील सघर्ष वाढत आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा अधिक बिटक होणार असून आतापासूनच बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. जागावाटप होण्याआधीच अजित पवार गटातील एका नेत्याने काहीही झाले तरी जनतेच्या इच्छेखातर आपण भाजपविरोधात निवडणूक लढणवणार असल्याचे जाहीर केले आहे.
आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत सकारात्मक पद्धतीने जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, महायुतीत अनेक जागांवरून संघर्ष आणि धुसफूस सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला असून आतापासूनट महायुतीत बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. अनेक इच्छुकांनी काहीही झाले तरी निवडणूक लढायचीच, असा निर्धार व्यक्त केला आहे. नागपूर पूर्व मतदारसंघात भाजपला चांगली आघाडी मिळते. मात्र, आता अजित पवार गटातील एका नेत्याने या जागेसाठी दावा केला असून भाजपविरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नागपूर पूर्व मतदारसंघात अजित पवार गटाच्या नगरसेविका आणि नेत्या आभा पांडे या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांनी आतापासून तयारीही सुरू केली आहे. लोकशाही आणि राजकारणात जनता सर्वोतोपरी असते. जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ही जागा आमच्यासाठी सोडायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, जनतेसाठी आपण मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या 15 वर्षापासून जो विकासाच्या बाता करत आहेत, त्यांना 3 वेळा आमदारकी मिळाली आहे. तरीही पहिल्या पावसात नागपूरात पाणी भरले. रस्त्यांची कामे पूर्ण नाहीत. अनियोजित विकासामुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेला नवा पर्याय हवा. त्यामुळे ते माझ्याकडे अपेक्षा ठेवत आहेत. महायुतीत ही जागा आमच्या वाट्याला आली नाही तरीही मी या मतदारसंघातून लढणार आहे. अजित पवार यांनाही आपण आपला निर्णय कळवला आहे. आता त्यांनी सांगितले तरी मी माघार घेणार नाही. माझी लढाई पुढे गेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता भाजपच्या नागपूरमध्येच अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी भाजपविरोधातच रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे जागावाटपापर्यंत नेमके काय होते, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.