मिंधे सरकारला पाठिंबा देणारा आमदार नाराज; कार्यक्रमात बोलू दिले नसल्याने व्यक्त केली खदखद

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधील बेबनाव अनेकदा उघड झाला आहे. मिंधे गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यात आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही गटांमध्येही अंतर्गत धुसफूस असून ती अनेकदा उघड झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही अनेक आमदार नाराज असल्याचे दिसून आले आहे. बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी आणि खदखद व्यक्त केली आहे. या नाराजीत आणखी एका आमदाराची भर पडली आहे. मिंधे सरकारला पाठिंबा देणारे आणखी एक आमदार नाराज झाले आहेत.

चंद्रपूर या त्यांच्याच मतदारसंघातील शासकीय कार्य़क्रमात दोन मंत्री असताना बोलू न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपुरच्या कृषी महोत्सवात बोलू न दिल्याने त्यांनी मला यापुढे बोलवत जाऊ नका, अशा शब्दांत आपली नाराजी आणि मनातील खदखद व्यक्त केली आहे. जोरगेवार यांचे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव होते. व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात या दोघांची भाषणे झाली परंतु जोरगेवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही यामुळे ते नाराज झाले आहेत. दोन्ही मंत्र्यांसमोर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

पुढील काळात भाषणाची संधी देणार असाल तरच निमंत्रण पत्रिकेवर नाव टाका, अन्यथा कार्यक्रमांना बोलवूही नका, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराचा प्रशासन अशाप्रकारे अपमान करू शकत नाही, अशा शब्दांत जोरगेवार यांनी मंत्र्यांसमोरच खडसावत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे मिंधे सरकारमधील धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे.