‘लाडक्या बहिणी’च्या भावाचे सिल्लोडमध्ये काळे झेंडे दाखवून स्वागत; मिंध्यांना भाजपचा घरचा आहेर

विधानसभा निवडणूक एकत्रित लढवण्याच्या गप्पा मारणार्‍या महायुतीत मोठी फाटाफूट झाल्याचे दिसून आले आहे. सिल्लोड येथे गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभाला आलेल्या मुख्यमंत्र्यांचे भाजप पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखवून स्वागत करत त्यांना घरचा आहेर दिला. मराठा आंदोलक आणि मुस्लिमांनीही मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.

मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा गाजावाजा करून सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. मतदारसंघातून महिलांना आणण्यासाठी 500 पेक्षा जास्त बसेस पाठवण्यात आल्या. आजच ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे मिळणार, अशी थाप मारून ही गर्दी जमवण्यात आली.

पहिला आहेर भाजपचा
मुख्यमंत्र्यांचे सिल्लोडमध्ये आगमन होताच भाजपने अगोदर काळे झेंडे दाखवले. भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावर अब्दुल सत्तार यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून भिंत बांधली. याचा निषेध म्हणून सांडू पाटील लोखंडे, सुनील पाटील मिरकर, मनोज मोरेल्लू, नगरसेविका रुपाली मोरेल्लू, विष्णू काटकर, वृषाली मिरकर या भाजप पदाधिकार्‍यांसह सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बॅनरबाजी करून काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘चोर है, चोर है, अब्दुल सत्तार चोर है’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी फरफटत या कार्यकर्त्यांना बाहेर आणले अटक करून त्यांची वरात फर्दापूर पोलीस ठाण्यात नेली.

काळे झेंडे, निषेधाच्या घोषणा
प्लॉट तसेच मालमत्ता बळकावल्याच्या निषेधार्थ पठाण कुटुंब आणि इतर मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सिल्लोड मार्गावर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनीही मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या. तर उंडणगाव येथील आशाबाई धोंडू बोराडे यांनी शैक्षणिक संस्थेसाठी जमीन बळकावणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात पोस्टर झळकावून मुख्यमंत्र्यांकडे न्याय देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच महिला उठून गेल्या
दुपारी 1 वाजेचा नियोजित कार्यक्रम ठिकठिकाणी झालेल्या निषेधाच्या घटनांमुळे कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता सुरू झाला. त्यामुळे सकाळी 10 वाजेपासून ताटकळत बसलेल्या महिला मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच मंडपातून निघून गेल्या. अब्दुल सत्तार हे वारंवार महिलांना हात जोडून बसण्याची विनंती करत होते. परंतु महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले.