राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार असून मुंबई, नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात या सरकारला अपयश आले आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मुंबई, नवी मुंबईत दलालांचा सुळसुळाट असून हप्तेबाजीखोरांचे जाळे पसरले आहे. शेतकरी, बेरोजगार तरुणांना न्याय देण्यास हे सरकार असक्षम ठरले आहे.
नवीन कायद्याबाबत माथाडी कामगार त्रस्त असून आशा सेविका मोबदल्यासाठी टाहो फोडत आहेत. गिरणी कामगार घरासाठी आंदोलन करत असताना त्याकडे या सरकारचे लक्ष जात नाही. बेकायदेशीर काम व धनदांडगे व्यावसायिक यांच्या मागे हे सरकार उभे असून सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले, असे आरोप अंबादास दानवे यांनी केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 260 अनव्ये प्रस्तावावर बोलताना त्यांनी हा विरोध नोंदवला.
अंबादान दानवे म्हणाले, “राज्यात मंगळवारी रात्री 14 जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकारने साधे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही. जवळपास 46 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. सरकार नुसत्या घोषणा आणि घोषणा शिवाय काही करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने अडवणूक पिळवणूक होत आहे ते पाहता दगडाला पाझर फुटेल अशी स्थिती आहे. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन केले जात नाही. कापूस,सोयाबीन, धान, केळी व संत्रा पिकांचे नुकसान होत असताना सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे न्याय देऊ शकत नाही. कापसाला 1 हजारा पेक्षा जास्त भाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर गुन्हे दाखल करू या सरकारने केलेल्या वाक्याचा त्यांना विसर पडला आहे, असेही दानवे म्हणाले.
२६० विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती माझी भूमिका | विधानभवन मुंबई – #LIVE https://t.co/rLIyj7kftT
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 28, 2024
नोटीफिकेशन मधून सरकारने मराठा समाजाची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. तसेच मराठा समाजाची लोकसंख्या 30 वरून 28 टक्के कशी झाली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री व दुसरे मंत्री वेगवेगळी भूमिका मांडतात, एकप्रकारे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. नवी मुंबईचे परिमंडळ 2 चे उपायुक्त विवेक पानसरे व पंकज ढहाणे हे मुख्यमंत्री यांच्या पक्षात येण्यासाठी दुसऱ्यांच्या फोनवरून धमक्या देत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली.