माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांची अजित पवार गटाला सोडचिठ्ठी; शरद पवार यांच्या पक्षात केला प्रवेश

आगामी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेते महायुतीतून बाहेर पडत आहेत. अजित पवार गटातील नेते, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवार गटाल सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच राज्याबाहेरील एक नेत्याने अजित पवार यांची साथ सोडली आहे. बिहारमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष राहत कादरी यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

एकामागेएक असे दोन नेते साथ सोडून गेल्याने अजित पवार यांच्या गटाला हादरा बसला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने चमकदार कामगिरी केल्याने अनेक नेते पुन्हा स्वगृही येत आहेत. तसेच माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षआत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पवार यांच्या उपस्थितीत दुर्रानी यांचा पक्षप्रवेश झाला.

या पक्षप्रवेशानंतर दुर्रानी म्हणाले की, गेल्या 10 वर्षात देशात जातीयवाद वाढला आहे. शरद पवार यांच्याकडे मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. त्यामुळे आता देशात आणि राज्यात परिवर्तन होण्याची गरज आहे. आपण शरद पवार यांची साथ सोडली, याची खंत वाटते, असेही दुर्रानी म्हणाले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे, असा दावाही दुर्रानी यांनी केला.