महाराष्ट्र पोलिसांना पश्चिम विभागीय जेतेपद

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच अव्वल असलेल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाने राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पहिल्यावहिल्या पोलिसांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेशचा सहज पराभव करत पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद संपादले. या स्पर्धेच्या बाद फेरीत आपल्या अव्वल कामगिरीचा धमाका केला. त्यांनी सीआरपीएफ, गुजरात पोलीस, गोवा पोलीस आणि मध्य प्रदेश पोलीस या चार संघांचा पराभव करीत विजयी चौकार ठोकत जेतेपदही पटकावले. या विजयामुळे ते पोलिसांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठीही पात्र ठरले आहेत.

अखिल हिंदुस्थानी पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाने सुरत येथे आयोजित केलेल्या या अखिल हिंदुस्थानी पोलीस टी-20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांनी बाद फेरीत सीआरपीएफच्या संघाचा 115 धावांनी धुव्वा उडवला, तर गुजरात पोलिसांवर सहा विकेट राखून मात केली. या दोन विजयांच्या जोरावर महाराष्ट्राने उपांत्य फेरीत धडक मारली.

हा थरारक सामना सुपर ओव्हरपर्यंत ताणला गेला, ज्यात महाराष्ट्र पोलिसांनीच विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम सामन्यात मध्य प्रदेश पोलिसांना 126 धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी रोहित पोळच्या तडाखेबंद 57 धावांच्या जोरावर विजयी लक्ष्य 5 फलंदाजांच्या मोबदल्यातच सहज गाठले आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. राज्य पोलीस संघाचे कर्णधार सुनील पाटील यांनी अष्टपैलू (170 धावा आणि 8 विकेट) कामगिरीच्या जोरावर स्पर्धेत सलग तीन ‘सामनावीर’ पुरस्कारासह ‘मालिकावीर’ आणि ‘उत्कृष्ट फलंदाजा’चाही पुरस्कार जिंकला.

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सुरत पोलीस आयुक्त अनुपमसिंग गहलोत, गुजरात पोलीस महानिरीक्षक आर. व्ही. असारी, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे अशोक वीरकर आणि एमसीएचे सहसचिव दीपक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.