![MAHARASHTRA POLICE](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/MAHARASHTRA-POLICE--696x447.png)
इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या अडचणी वाढल्या आहेत. या शोवर बंदी घालावी, या मागणीने जोर धरला असतानाच आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग डिलीट करावेत, असे निर्देश दिले आहेत.
समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. रणवीर अलाहाबादियाविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यासह या शोमध्ये सहभागी झालेल्या कॉमेडियन्सच्या पॅनलवर कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी समय रैना, बलराज घई तसेच अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमधील वादग्रस्त भाग पाहून पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळय़ा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एफआरआयनुसार 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणवीरसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल
यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंद केला. रणवीर, समय रैनासह 30 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने रणवीरच्या अडचणी वाढणार आहेत. छोटय़ा पडद्यावरील इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात यूटय़ूबर रणवीर अलाहाबादियाने वादगस्त विधान केले होते. तो त्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित होता. रणवीरने एका स्पर्धकाशी संभाषण करताना ते आक्षेपार्ह विधान केले होते. त्या विधानाने रणवीरविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. आयोजक, कलाकार आणि संबंधित असणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.