महाराष्ट्राच्या इब्राहिम अलीचा जोरदार विजय, महाराष्ट्र ओपन चॅलेंजर कॅरम स्पर्धेला प्रारंभ

दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या इब्राहिम अलीने मध्य प्रदेशच्या अयाझ नवाबवर 6-22, 14-10, 18-12 असा विजय मिळवून आगेकूच केली. तसेच सुभाषचंद्र अमानूरने ( महाराष्ट्र ) कुमार जे. (तामीळनाडू ) 17-3, 13-14, 12-9 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

आजपासून सुरू झालेल्या भव्यदिव्य कॅरम स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीलंका कॅरम फेडरेशनचे महासचिव लँगली मथायझ, मालदिवज कॅरम फेडरेशनचे महासचिव रौशन अहमद, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, मानद सचिव अरुण केदार, तसेच महेश शेखरी, फ्रान्सिस सेराव, मुकुल झा, अतुल मेहरा आदी मान्यवर उपस्थित होते.