टॅक्स भरण्यात महाराष्ट्र ‘नंबर वन’

31 मार्च 2025 पर्यंत देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी आयकर भरला आहे. परंतु यात आनंदाची बाब म्हणजे टॅक्स भरण्यात देशात महाराष्ट्र राज्य नंबर वन स्थानी आहे. एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 1.39 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरल्याची माहिती आहे. ही संख्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.86 टक्के जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2024 मध्ये आयकर परताव्यांची संख्या 8.52 कोटी होती. 2023 मध्ये ही संख्या 7.78 कोटी होती. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 18 टक्के जास्त लोकांनी रिटर्न दाखल केले.

नवीन कर प्रणालीनुसार, आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पगारदारांसाठी ही सूट 75,000 रुपयांच्या मानक वजावटीसह 12.75 लाख रुपयांपर्यंत वाढेल. नवीन कर प्रणालीमध्ये 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नासाठी 25 टक्के कर दराचा नवीन स्लॅबदेखील समाविष्ट आहे. भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आता 6 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक भाड्यावर टीडीएस कापला जाणार नाही.

बँका आणि पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सूट 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर 1 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. जुने आयकर रिटर्न भरण्याची मर्यादा 2 वर्षांवरून 4 वर्षे करण्यात आली आहे. म्हणजेच, जर एखाद्या करदात्याने त्याचे रिटर्न चुकीचे भरले असेल किंवा ते भरण्यास चुकले असेल, तर तो आता 4 वर्षांच्या आत अपडेटेड रिटर्न भरून चूक सुधारू शकेल.

आयटीआर भरणारी प्रमुख राज्ये

  • महाराष्ट्र – 1.39 कोटी
  • उत्तर प्रदेश – 91.38 लाख
  • गुजरात – 88.58 लाख
  • राजस्थान – 59.77 लाख
  • तामीळनाडू – 57.27 लाख
  • कर्नाटक – 53.62 लाख
  • दिल्ली – 44.66 लाख
  • पंजाब – 44.26 लाख

मार्च 2025 पर्यंत एकट्या महाराष्ट्र राज्यातून तब्बल 1.39 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहेत.

दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश, तर गुजरात तिसऱ्या स्थानी

देशात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 31 मार्च 2025 पूर्वी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 10,814 लोकांनी त्यांचे रिटर्न दाखल केले होते, तर 5-10 कोटी उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या 16,797 आहे. त्याच वेळी, 1 ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान उत्पन्न असलेल्या 2.97 लाख लोकांनी रिटर्न दाखल केल्याची माहिती आयटीआरमधून उघड झाली आहे.