रेडी रेकनर वाढला घरे महागली! मुंबईत 3.39 तर ठाण्यात 6.69 टक्के दरवाढ

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गेली दोन वर्षं घरे आणि मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्क दर तक्ता म्हणजेच रेडी रेकनरची दरवाढ महायुती सरकारने केली नव्हती. मात्र सत्तेवर येताच रिकामी तिजोरी भरण्यासाठी ‘संपले इलेक्शन, वाढवा कलेक्शन’ असे धोरण सरकारने अवलंबले आहे. रेडी रेकनरच्या दरात मुंबईवगळता राज्यात सरासरी 4.39 टक्के वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के, ठाणे 7.72 टक्के, पुणे 4.16 टक्के, पिंपरी-चिंचवड 6.69 टक्के एवढी रेडी रेकनरमध्ये वाढ केली आहे. राज्यात सर्वाधिक 10.17 टक्के सोलापुरात वाढ आहे. यामुळे घरे महाग होणार असून याचा थेट फटका मध्यमवर्गीयांना बसणार आहे.

ग्रामीण क्षेत्रामध्ये वाढ करताना भूखंड विक्रीच्या जाहिराती रियल इस्टेट वेबसाईटवरील माहिती याचा आधार घेण्यात आला. तसेच ग्रामीण क्षेत्रातील गावे नगरपरिषदा आणि नगरपंचायत हद्दीतील रहिवास वापर, महापालिका हद्दीलगतची गावे आणि प्रभावक्षेत्र याचादेखील विचार करण्यात आला आहे.

पुण्यात 4.16 टक्के वाढ…

पुणे महापालिका क्षेत्रात 4.16 टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ही वाढ 6.69क एवढी आहे. त्यामुळे पिणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये घरांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पुणे जिह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये देखील सरासरी वाढ 4.97 टक्के पर्यंत आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातही घरांच्या किमती वाढणार आहेत.

सन 2025-26 सरासरी वाढ

ग्रामीण क्षेत्र – 3.36 टक्के, ह प्रभाव क्षेत्र -3.29 टक्के
नगरपरिषद / नगर पंचायत क्षेत्र – 4.97 टक्के
महानगरपालिका क्षेत्र-5.95 टक्के (मुंबई वगळता)
राज्याची सरासरी वाढ – 4.39 टक्के (मुंबई वगळता)
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ – 3.39 टक्के
संपूर्ण राज्याची एकूण वाढ – 3.89 टक्के

गेली दोन वर्षे वाढ केली नव्हती

गेल्या दहा वर्षांमध्ये वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करताना वाढ करण्यात आली. यामध्ये 2015 मध्ये राज्यात सरासरी 14 टक्के, 2016 मध्ये सात टक्के 2017 मध्ये 5.86 टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन वर्ष वाढ केलेली नव्हती. 2020 मध्ये 1.74 टक्के वाढ केली. त्यानंतर 2021 मध्ये वाढ झाली नाही. 2022 मध्ये 4.81 टक्के रेडी रेकनर वाढविण्यात आला. गेली दोन वर्ष वाढ केलेली नव्हती.

नागरी व प्रभावक्षेत्र ठरवताना खरेदी-विक्री व्यवहाराचे विश्लेषण मंजूर प्रादेशिक योजना तसेच विकास योजना यामध्ये झालेले फेरबदल, त्यांची नोंद, सदनिकांचे महापालिका क्षेत्रातील जमिनीचे दर, बांधकाम दर आणि किमान जमीनदर याचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व्हे नंबर, गट नंबर आणि सिटी सर्व्हे नंबर याप्रमाणे बदलाची नोंद घेऊन रेडी रेकनर ठरविण्यात आला आहे.

प्रभाव क्षेत्रामध्ये 3.29 टक्के तर नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रात 4.97 टक्के वाढ केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मुंबईवगळता ही वाट 5.95 टक्क्यांपर्यंत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सरासरी 3.39 टक्के वाढ झाली आहे. राज्यामध्ये सर्वाधिक 10.17 टक्के दरवाढ ही सोलापूर जिह्यात तर ठाणे जिह्यामध्ये 7.72 टक्के दरवाढ झाली आहे.

रिकामी तिजोरी भरण्यासाठी महायुती सरकारचा शुल्कवाढीचा वरवंटा

राज्यातील महायुती सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून, देणेकऱ्यांची अब्जावधी रुपयांची बिले थकली आहेत. सरकार कर्जबाजारी झाल्यामुळे आता तिजोरी भरण्यासाठी मुद्रांक शुल्कवाढीचा वरवंट जनतेवर फिरवला जात आहे. एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांचे घराचे स्वप्नदेखील महायुती सरकारने महाग केले आहे. रेडी रेकनरमध्ये वाढ आणि नवे दर यासंबंधीचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांचा प्रस्ताव महसूल विभागाने मंजूर केला. त्यानंतर आज रात्री रेडी रेकनरचे नवे दर जाहीर करण्यात आले. या मुद्रांक शुल्कवाढीची तत्काळ उद्या (दि. 1) पासून अंमलबजावणी होणार आहे.