‘नीलकमल’ दुर्घटनेनंतरही बंदर विभाग कुंभकर्णी झोपेत, मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

मुंबईहून घारापुरी येथे जाणाऱ्या ‘नीलकमल’ बोटीच्या अपघातात 15 जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच बंदर विभाग मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. मोरा आणि रेवस सागरी मार्गावरील समुद्रातील दिशादर्शक यंत्रणाच गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे धुरके पसरत असल्याने सिग्नल यंत्रणेअभावी या मार्गावर प्रवासी बोटी भरकटतात आणि गाळातही रुतून बसतात. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल मुंबई जलवाहतूक संस्थेने केला आहे.

मोरा आणि रेवस मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या सागरी मार्गावरून मुंबईतील भाऊचा धक्का येथून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या लाँचेस प्रवासी वाहतूक करतात. शॉर्टकट आणि वाहतूककोंडी मुक्त प्रवासामुळे प्रवासी याच जलमार्गाला सर्वाधिक प्राधान्य देतात. या आधी मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांच्या दरम्यान दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. समुद्रातच लाल आणि हिरव्या रंगाचे दिवे असलेले दिशादर्शक बोये टाकण्यात येत होते. दोन्ही बाजूला दिशादर्शक सिग्नल यंत्रणा असल्याने त्यामधील समुद्र खाडी चॅनलमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचेस बिनदिक्कतपणे योग्य दिशेने अचूक मार्गक्रमण करीत असत. रात्र असो किंवा धुके पसरलेले असो लाँच चालवणारे नाखवा लांबूनच दिसणाऱ्या दिशादर्शक सिग्नलचा आणि साचलेल्या गाळाचा अंदाज घेऊन बंदरात प्रवाशांना घेऊन पोहोचत असत. मोरा आणि रेवस बंदरातील जेट्टीवरही उंच ठिकाणी लाल दिव्याच्या सिग्नलची व्यवस्थाही करण्यात येत होती.

खलाशी अंदाजे लाँच चालवतात

मागील काही वर्षांपासून मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांतून दिशादर्शक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे सकाळी पडणारे दाट धुके आणि रात्रीच्या प्रवासात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचेसच्या खलाशांना बंदरांचा अंदाज येत नाही. दिशादर्शक सिग्नल व्यवस्थाच काही वर्षांपासून कोलमडली असल्याने या दोन्ही बंदरांतून प्रवासी वाहतूक करताना नेमक्या मार्गाचा अंदाज येत नसल्याने खलाशी अंदाजे लाँच चालवतात. या लाँचेस मग भरकटतात, गाळात रुतून बसतात. यामुळे मात्र गंभीर दुर्घटनेची भीती सातत्याने खलाशांना भेडसावत असते.

बंदर विभागाचे अधिकारी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहात आहेत काय?

रेवस आणि मोरा या दोन्ही बंदरांतील चॅनल आणि जेट्टीवर दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने आम्ही बंदर विभागाकडे करत आहोत. मात्र बंदर विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याची खंत मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी व्यक्त केली आहे. बंदर विभागाचे अधिकारी आणखी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहेत काय, असा संतप्त सवाल मुकादम यांनी केला.